सातारा जिल्हा रुग्णालयाचा ‘कळस’; मृतांच्या देहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारापूर्वीच फुटले बिंग!
प्रशासनाचा निर्दयी कारभार! साताऱ्यात पुन्हा 'बॉडी' बदलली; मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार थांबणार कधी?

सातारा जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यामुळे नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिन्याभरात घडलेली ही दुसरी घटना असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सोनगरवाडी (ता. वाई) येथील आनंद ओव्हाळ (वय २६) यांनी विषप्राशन केल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. तर आरळे येथील सुरेश मस्कु खोमणे (वय ५१) हे मागील तीन दिवसांपासून उपचार घेत होते. उपचारादरम्यान रात्री त्यांचे निधन झाले.
दोन्ही मृतदेहांचे रात्रीच शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, सकाळी नातेवाईकांना चेहरा न दाखवता मृतदेह ताब्यात देण्यात आल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे. बॉडी ताब्यात दिल्यानंतर आरळे येथील नातेवाईकांनी खोमणे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले.

दरम्यान, ही अदलाबदल झाल्याचे लक्षात येताच अंत्यसंस्कारासाठी पेटवलेली चिता विझवण्यात आली. या घटनेमुळे नातेवाईक आक्रमक झाले असून, रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याच्या (स्वीपर) हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



