कर्तव्य तत्पर पोलीस कर्मचारी संताजी मानेंचा केला सन्मान
कर्तव्य तत्पर पोलीस कर्मचारी संताजी मानेंचा सन्मान
कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवतीचे प्राण पोलीस कर्मचारी संताजी माने यांनी वाचवले होते. कराडच्या पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी त्यांच्या कर्तव्य तत्परतेची दखल घेत त्यांचा सन्मान केला. माने यांनी प्रसंगावधान राखत दाखवलेले धैर्य हे संपूर्ण पोलीस दलासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
कराडच्या कृष्णा नदीपात्रात चार दिवसांपुर्वी पाण्याचा प्रवाह प्रचंड होता. युवतीने आत्महत्येचा प्रयत्न करत नदीत उडी टाकल्याचे समजतात संताजी माने यांनी क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेतली. प्रवाहाशी झुंज देत त्यांनी युवतीपर्यंत पोहोचून तिला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. त्यांच्या या धाडसी कृतीमुळे एका जीवाला नवसंजीवनी मिळाली.याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, सागर बर्गे, मयूर देशमुख, प्रवीण पवार, दीपक कोळी, संतोष सपाटे, प्रशांत चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सत्कारावेळी पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील म्हणाल्या एखाद्याचा जीव वाचवणे यासारखे मोठे कार्य दुसरे नाही. संताजी माने यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता धाडस दाखवले. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेची नोंद त्यांच्या सेवेत विशेष कार्य म्हणून राहील.
‘फोर्स वन’चे ट्रेनिंग कामी आले
-
युवतीने नदीपात्रात उडी घेताच पोलीस संताजी माने यांनी तात्काळ आपली जबाबदारी ओळखत तिला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. अशा प्रसंगात नेमके काय करायचे हे त्यांना सुचले कारण त्यांनी फोर्स वनचे सहा वर्षे प्रशिक्षण घेतले आहे. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत नेमके आपण कसे आणि काय करायचे याचे भान त्यांना आहे. त्याचा उपयोग युवतीचे प्राण वाचवण्याच्या झाला हे कौतुकास्पद आहे असे पोलीस उपअधिक्षक राजश्री पाटील यांनी सांगितले.



