चिंचणी येथे दुष्काळग्रस्त पिकांची बांधावर जाऊन पाहणी; प्रांत साहेब, खासदार उदयनराजे भोसले समर्थक व शेतकऱ्यांची उपस्थिती

चिंचणी प्रतिनिधी श्रीकांत गोळे
चिंचणी आणि परिसरात जाणवणाऱ्या तीव्र दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने थेट शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. प्रांताधिकारी आशिष बारकुल यांच्या नेतृत्वाखाली ही पाहणी करण्यात आली असून, प्रशासनाने थेट शेतात उतरून वाळलेली पिके आणि निर्माण झालेली चारा-पाण्याची टंचाई पाहिल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या पाहणी दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांनी दुष्काळामुळे होरपळलेल्या पिकांची व शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक तथा चिंचणी गावचे सोसायटी संचालक बाळासाहेब गोळे तसेच माजी सरपंच मयूर पवार यांनी प्रशासनासमोर शेतकऱ्यांची बिकट अवस्था मांडली आणि तातडीने मदत देण्याची मागणी केली.
या प्रसंगी गावातील शेतकरी आनंदराव सावंत, महेश सावंत, चंद्रकांत सावंत, सय्यद अण्णा, कैलास सावंत, आशिष सणस यांच्यासह चिंचणी गावातील बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने व प्रशासनाने या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.



