छत्रपती संघटनेकडून नगरसेवक रविराज किर्दत यांचा विशेष सन्मान; सामाजिक योगदानाची दखल.

सातारा : सामाजिक बांधीलकी जपत जनहिताच्या प्रश्नांवर सतत धावून येणारे सातारा नगरपालिकेचे नगरसेवक रविराज किर्दत यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘छत्रपती संघटना, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भव्य उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला.
छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य ही संस्था सातत्याने गरजू घटकांना मदत, जनजागृती, सामाजिक एकोपा आणि लोकहिताचे विविध उपक्रम राबवण्यात अग्रेसर आहे. संघटनेच्या या सामाजिक प्रवासात नगरसेवक रविराज किर्दत यांनी नेहमीच मोलाचे सहकार्य, मार्गदर्शन व भक्कम पाठबळ दिले आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न आणि सामाजिक उपक्रमांना त्यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते.
सत्काराला उत्तर देताना नगरसेवक रविराज किर्दत यांनी छत्रपती संघटनेच्या या उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार मानले. “समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करणे काळाची गरज आहे. छत्रपती संघटना राबवत असलेल्या लोककल्याणकारी कार्यासाठी माझे नेहमीच शक्य ते सर्व सहकार्य आणि मार्गदर्शन राहील,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या सोहळ्यात उपस्थितांनी किर्दत यांच्या सार्वजनिक कार्याचे कौतुक करत भविष्यातही त्यांच्याकडून अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. सामाजिक कार्याला नवी ऊर्जा देणारा आणि समाजोपयोगी कामांना प्रोत्साहन देणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.



