संत गाडगे बाबा हे तरुणांचे आदर्श असायला हवेत : बाळासाहेब कोकरे किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा.

वाई (प्रतिनिधी): “संत गाडगे बाबा हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर स्वच्छता, सामाजिक बांधिलकी, श्रमप्रतिष्ठा आणि मानवसेवेचा आदर्श होते. आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजासाठी सकारात्मक कार्य करावे. संत गाडगे बाबा हे प्रत्येक तरुणाचे आदर्श असायला हवेत,” असे प्रतिपादन बाळासाहेब कोकरे यांनी केले.
जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर कनिष्ठ महाविद्यालय, वाई येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, संत गाडगे बाबांनी स्वच्छता आणि श्रमप्रतिष्ठेचा संदेश संपूर्ण समाजाला दिला. तरुणांनी या विचारांतून प्रेरणा घेऊन स्वतःच्या विकासासोबत समाजउन्नतीसाठी योगदान दिले पाहिजे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. अध्यक्षीय भाषणात बोलताना ते म्हणाले, “राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होते.”
विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान
स्वातंत्र्य महोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वक्तृत्व, निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन उमेश आडुळकर यांनी केले.
कार्यक्रमप्रसंगी उपप्राचार्य श्री. श्रावण पवार व पर्यवेक्षक डॉ. विलास खंडाईत यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
उत्साही वातावरण
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला, तर गौरी पोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्वेता भस्मे यांनी सूत्रसंचालन केले आणि शशांक निकुंभ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन कस्तुरे व प्रवीण मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी सतीश तावरे, संतोष दोरके, जितेंद्र चौगुले, अमोल जाधव, पराग डोंगळे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



