यवतेश्वर घाटात पर्यटकांच्या मिनी बसचा थरारक अपघात; २ जखमी, मोठा अनर्थ टळला

यवतेश्वर घाटाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पर्यटकांच्या मिनी बसला भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मिनी बस थेट दरीच्या दिशेने गेली, मात्र रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षण कठड्याला जोरात धडकून थांबल्याने बस दरीत कोसळता कोसळता थोडक्यात बचावली. या अपघातात २ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना यवतेश्वर घाटातील पावर हाऊस नजीक घडली. पर्यटकांना घेऊन जाणारी मिनी बस घाटातील वळणावर आली असताना अचानक हा अपघात घडला. बाजूचा कठडा मजबूत असल्याने बस दरीच्या टोकावर जाऊन अडकली आणि मोठा अनर्थ टळला. अपघाताच्या वेळी बसमध्ये पर्यटकांची उपस्थिती होती, त्यामुळे काही काळ घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या अपघातात २ पर्यटक जखमी झाले असून, त्यांना स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने तातडीने रुग्णवाहिकेतून सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे चंद्रसेन पवार, रोहित बनसोडे आणि ऋषी रंकाळे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे व वेळेवर केलेल्या मदतीमुळे सर्व पर्यटकांचे प्राण वाचले असून त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली व पुढील तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक कोंडी सोडवली व पुढील तपास सुरू केला आहे. घाटातील धोकादायक वळणावर चालकांनी वाहने सावकाश चालवावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



