साताऱ्यातील जुना आरटीओ चौक ते वाढेफाटा मार्गावर रम्बलरचा अतिरेक; अवघ्या दीड किमीत २२ पट्टे!

सातारा : विशेष प्रतिनिधी
साताऱ्यातील जुना आरटीओ चौक ते वाढेफाटा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग सध्या वाहनधारकांसाठी मोठा मनस्ताप ठरत आहे. अवघ्या दीड किलोमीटरच्या या टप्प्यात तब्बल २२ रम्बलर स्ट्रिप्स (थरथरणारे गतिरोधक) बसवण्यात आल्याने हा रस्ता प्रवासासाठी नव्हे, तर वाहनधारकांच्या ‘मणक्यांची चाचणी’ घेण्यासाठीच तयार केला आहे की काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
महिनाभरापूर्वी काढले, पुन्हा जैसे थे!
नागरिक आणि वाहनधारकांच्या तीव्र विरोधानंतर महिनाभरापूर्वीच या मार्गावरील रम्बलर हटवण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, प्रशासनाने आठवडाभरापूर्वी पुन्हा या ठिकाणी रम्बलर बसवण्याचा सपाटा सुरू केला आहे. “काढलेले रम्बलर पुन्हा का बसवले?” असा थेट प्रश्न आता त्रस्त नागरिक विचारत आहेत.
वाहतुकीच्या कोंडीत भर आणि आरोग्याचा प्रश्न
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर आधीच वाहतुकीचा मोठा ताण आहे. त्यातच दर शंभर मीटरवर लागणाऱ्या रम्बलरमुळे वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडी होत आहे. प्रत्येक काही सेकंदांनंतर बसणाऱ्या तीव्र झटक्यांमुळे दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ नागरिकांना पाठीच्या व मणक्यांच्या व्याधींना सामोरे जावे लागत आहे. “वाढेफाट्याला जायचे की थेट फिजिओथेरपी सेंटरला?” अशी उपरोधिक चर्चा आता वाहनधारकांमध्ये रंगू लागली आहे.
शास्त्रीय निकषांचा पूर्ण फज्जा
अपघात रोखण्यासाठी गतिरोधक आवश्यक असतात हे मान्य असले, तरी ते विशिष्ट अंतरावर आणि नियमांनुसार असणे गरजेचे आहे. मात्र, या मार्गावर नियमांची पायमल्ली करत रम्बलरचा अतिरेक करण्यात आला आहे. प्रशासनाने यावर तात्काळ योग्य तो तोडगा काढून वाहनधारकांना होणारा त्रास कमी करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.



