Uncategorized

रहिमतपूर पोलिसांची धडक कारवाई: लष्करी जवानाच्या घरातील २ लाखांची सोने चोरी २४ तासांत उघडकीस; अल्पवयीन मुलगा ताब्यात.

सुट्टीवर आलेल्या आर्मी जवानाच्या घरातून चोरलेली सोन्याची साखळी (चेन) अवघ्या २४ तासांत हस्तगत करण्यात रहिमतपूर पोलिसांना यश आले आहे. स्थानिक सोनाराच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांनी लावलेल्या शिताफीच्या सापळ्यामुळे २ लाख रुपये किमतीचा १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका विधिसंघर्षित (अल्पवयीन) बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?

बारीव (ता. कोरेगाव) येथील रहिवासी आणि सैन्यात कार्यरत असलेले जवान श्री. धनंजय संतोष पोळ हे २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरातील वरच्या मजल्यावर आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी गळ्यातील सोन्याची चेन काढून टेबलवर ठेवली होती. त्यानंतर ते शेतात निघून गेले. दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतातून परत आल्यावर त्यांना टेबलवरील सोन्याची साखळी गायब असल्याचे दिसून आले. सर्वत्र शोध घेऊनही साखळी न सापडल्याने अज्ञात चोरट्याने ती चोरल्याची खात्री झाली.

​जवान धनंजय पोळ यांच्या फिर्यादीवरून रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १३४/२०२६, BNS कलम ३०५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.

अशी झाली धडक कारवाई

सैनिकाच्या घरात चोरी झाल्याचे गांभीर्य ओळखून सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विनोद नेवसे यांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली.

​तपासादरम्यान एक अल्पवयीन मुलगा चोरीची सोन्याची साखळी विक्री करण्यासाठी आल्याची गुप्त माहिती स्थानिक सोनारांकडून पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचून या विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून १६ ग्रॅम वजनाची आणि सुमारे २,००,०००/- रुपये किमतीची गोल कड्यांच्या डिझाईनची सोन्याची साखळी हस्तगत करण्यात आली. अल्पवयीन बालकावर बाल न्याय कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई सुरू आहे.

स्थानिक सोनाराची सतर्कता ठरली महत्त्वाची

या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक सराफाने दाखवलेली सतर्कता अत्यंत मोलाची ठरली. या पार्श्वभूमीवर रहिमतपूर पोलिसांच्या वतीने व्यापारी व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही पक्क्या बिलाशिवाय, पावतीशिवाय किंवा मालकी हक्काच्या पुराव्याशिवाय सोन्याचे दागिने विकायला येणाऱ्या अथवा घाईघाईत संशयास्पद साहित्य विकू पाहणाऱ्या व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी.

तपास पथक

ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक एम. एम. खान, सपोफौ जयराम पवार, दीपक जाधव, पोलीस हवालदार बर्गे (बॅज नं. १०२), पोलीस नाईक शिंदे (बॅज नं. १५३), पोलीस कॉन्स्टेबल तुषार काळंगे (बॅज नं. ७६०), अमर भोसले (बॅज नं. १०४९), समाधान देशमुख (बॅज नं. १९११) आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्पिता गायकवाड यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या सुपरफास्ट कामगिरीबद्दल नागरिक व सैनिकाच्या कुटुंबाकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button