Uncategorized

आनेवाडी टोलनाक्यावरील थरारानंतर नागेवाडीत जमाव आक्रमक; सातारा तालुका पोलिसांच्या धाडशी कामगिरीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न टळला

आनेवाडी टोलनाक्यावरील थरारानंतर नागेवाडीत जमाव आक्रमक; सातारा तालुका पोलिसांच्या धाडशी कामगिरीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न टळल ​‘तुम्ही वेळेत आला नसता तर...’ सातारा तालुका पोलिसांच्या प्रसंगावधानाचे नागेवाडीत प्रत्यक्षदर्शींकडून कौतुक.

नागेवाडीत हायवेवर थरार! आक्रमक जमावाच्या तावडीतून पोलिसांकडून दोघांची सुटका; अनर्थ टळला

आनेवाडी टोलनाक्यावर कर्मचाऱ्याला बोनेटवर ओढत नेऊन अपघात करणाऱ्या चालकाला व त्याच्या सहकाऱ्याला नागेवाडी येथे आक्रमक जमावाने पकडून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या १० मिनिटांत घटनास्थळी धाव घेत, हिंसक जमावाच्या तावडीतून रक्तबंबाळ झालेल्या दोघांची सुटका केली. पोलिसांच्या या धाडसी व तत्पर कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला असून हायवेवरील वाहतूक अवघ्या काही मिनिटांत सुरळीत करण्यात आली.

नक्की काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास एक जीप कार चालक आनेवाडी टोलनाक्याच्या अगोदर दोन ते तीन वाहनांना कट मारून वेडीवाकडी गाडी चालवत पुढे आला. टोलनाक्यावर कर्मचाऱ्याने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने त्याला कारच्या बोनेटवर घेऊनच गाडी पुढे पळवली. यानंतर हायवेवर नागेवाडी परिसरात जमावाने या कारला अडवले.

​अपघात आणि चालकाचे कृत्य पाहून संतप्त झालेल्या जमावाने कारमधील चालक व त्याच्या सोबत्याला बाहेर काढून बेदम मारहाण सुरू केली. यामुळे दोघेही गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले होते. तसेच महामार्गावर दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचे तत्पर आदेश

घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी क्षणाचाही विलंब न करता बीट मार्शल, अपघात विभाग व हायवे पेट्रोलिंग पथकाला तत्काळ घटनास्थळी रवाना केले.

जमावात घुसून पोलिसांचे धाडस

पोलीस हवालदार सचिन घोरपडे (ब.नं. ६०२), पोलीस शिपाई उमेश बगाडे (ब.नं. ८९८) आणि अपघात विभागाचे पोलीस हवालदार सुरज रेळेकर (ब.नं. २१५७) हे अवघ्या १० मिनिटांत घटनास्थळी धडकले. जमाव अत्यंत आक्रमक आणि हिंसक झालेला होता. कायदा हातात न घेण्याचे आवाहन करूनही लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

​परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून तिन्ही पोलीस अंमलदार आणि नागेवाडीचे पोलीस पाटील विक्रम यशवंत भोसले यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट हिंसक जमावात प्रवेश केला. त्यांनी आक्रमक लोकांच्या तावडीतून जखमी चालकाला व त्याच्या सोबत्याला सुरक्षित बाहेर काढले.

वाहतूक केली सुरळीत

पोलिसांनी जखमींना तत्काळ हायवे हेल्पलाइनच्या वाहनातून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त जीप कार क्रेनच्या साहाय्याने भुईंज पोलीस ठाण्यात रवाना करण्यात आली. यानंतर केवळ ५ ते ७ मिनिटांत महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत करण्यात आली.

नागरिकांकडून कौतुक अन् अधिकाऱ्यांची शाब्बासकी

“तुम्ही जर वेळेत आला नसता तर कारचालक व त्याच्या सोबत्यासोबत भयंकर घटना घडली असती, लोकांनी गाडी पेटवून दिली असती,” अशा शब्दांत उपस्थितांनी पोलिसांच्या धाडसाचे कौतुक केले. या उत्कृष्ट आणि प्रसंगावधान राखून केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी तिन्ही अंमलदारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांचे विशेष अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button