अखेर मोळाचा ओढा श्वास मोकळा! तालुका पोलिसांचा मदतीनें PWD च्या उपस्थिती मध्ये अतिक्रमणधारकांना दणका!
मोळाचा ओढा परिसर झाला 'ऑल क्लिअर'! मंडई, हातगाडे अन् पानटपऱ्यांवर हातोडा; वाहतुकीची कोंडी फुटली!

अतिक्रमणाचा पुरता ‘मोडीत काढला’! तालुका पोलीस अन् PWD ची संयुक्त धडक कारवाई, मोळाचा ओढा परिसर मोकळा!
मोळाचा ओढा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीला प्रचंड अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर अखेर प्रशासनाचा हातोडा पडला आहे. तालुका पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत परिसरातील मंडई, हातगाडे आणि बेकायदेशीर पानटपऱ्या हटवण्यात आल्या असून, या कारवाईमुळे मोळाचा ओढा परिसराने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला आहे.

मोळाचा ओढा हा परिसर वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मानला जातो. मात्र, गेल्या काही काळापासून रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतपणे बसणारे मंडईचे विक्रेते, हातगाडे आणि मोकळ्या जागेत थाटलेल्या पानटपऱ्यांमुळे रस्त्याची रुंदी कमालीची कमी झाली होती. त्यामुळे येथे रोजच लहान-मोठ्या अपघातांना आणि तासनतास होणाऱ्या वाहतूक कोंडीला वाहनधारकांना अन् पादचाऱ्यांना सामोरे जावे लागत होते. याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

नागरिकांची हीच समस्या गांभीर्याने घेत तालुका पोलीस ठाणे आणि PWD विभागाच्या पथकाने गुरुवारी अचानक धडक कारवाई सुरु केली. पोलीस बंदोबस्तात रस्त्यावरील बेकायदेशीर हातगाडे, फळ-भाजी विक्रेत्यांची अतिक्रमणे आणि वाहतुकीस अडथळा ठरणार्या पानटपऱ्या हटवून रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला.

नागरिकांमधून समाधान!
प्रशासनाच्या या धडक आणि कडक भूमिकेमुळे परिसरातील वाहतूक आता सुरळीत झाली आहे. सलग होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळाल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी सुटकेचा निःश्वास सोडत तालुका पोलीस निलेश तांबे व PWD प्रशासनाचे आभार मानले आहेत. पुन्हा या ठिकाणी अतिक्रमणे होणार नाहीत, यासाठी प्रशासनाने सतत देखरेख ठेवावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.



