रेणावी घाटातील ‘तो’ भीषण अपघात म्हणजे निष्काळजीपणाचा बळी! मेढा आगाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे ३ प्रवाशांचा नाहक बळी
अतिरिक्त ताण, विश्रांतीचा अभाव अन् निकृष्ट देखभाल; एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभारावर प्रवाशांमधून संतापाची लाट!

खास बातमी / विशेष प्रतिनिधी: श्रीकांत गोळे
सांगलीच्या रेणावी घाटात दोन एसटी बसेसची झालेली भीषण समोरासमोरील धडक ही केवळ एक ‘अपघात’ नसून, एसटी महामंडळ आणि विशेषतः मेढा आगार प्रशासनाच्या भोंगळ व नियोजनशून्य कारभाराचा थेट परिणाम असल्याचे आता स्पष्ट होत आहे! या अपघातात ३ निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून १५ ते २० प्रवासी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. पण याला जबाबदार कोण?
अपघातामागचे भयानक वास्तव:
-
- चालकांना विश्रांतीच नाही! विजापूरसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गावरून रिटर्न येताना चालकांना पुरेशी विश्रांती देणे अत्यंत गरजेचे असते. मात्र, विश्रांती न देताच चालकांना गाड्या चालवायला लावल्याने थकवा आणि डुलकी यामुळेच हा भीषण अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
- मेढा आगारात वाहक-चालकांवर अतिरिक्त कामाचा ताण: मेढा आगारात चालक आणि वाहकांचा वापर इतरत्र कामांसाठीच जास्त केला जात आहे. त्यामुळे उरलेल्या मोजक्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. या ताणापोटीच आगार प्रशासन लांब पल्ल्याच्या गाड्या परस्पर परत आगारात बोलवून घेत आहे, ज्यामुळे चालकांची शारीरिक व मानसिक हानी होत आहे.
- गाड्यांची देखभाल शून्य: मेढा आगारातील बसेसची नियमित देखभाल आणि दुरुस्ती पूर्णपणे धाब्यावर बसवली गेली आहे. भंगार झालेल्या गाड्या रस्त्यावर उतरवून प्रवाशांच्या जिवाशी थेट जुगार खेळला जात आहे.
- महिन्याभरात तब्बल ४ अपघात! मेढा आगाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे मागील अवघ्या एका महिन्यात तब्बल चार अपघात झाले आहेत! रेणावी घाटातील हा अपघात त्या सर्वांमधील अत्यंत भीषण आणि जीवघेणा ठरला आहे. तरीही आगार प्रशासनाचे डोळे उघडलेले नाहीत.
प्रवाशांचा सवाल: बलिदानानंतरच प्रशासन जागे होणार का?
”महामंडळाला फक्त महसूल गोळा करण्यात रस उरला आहे का? कर्मचाऱ्यांना पुरेशी विश्रांती न देणे, गाड्यांची योग्य देखभाल न करणे आणि मानवी हक्कांची पायमल्ली करून बसेस धाववणे म्हणजे प्रवाशांना थेट मृत्यूच्या दाढेत ढकलण्यासारखेच आहे.”
वारंवार अपघात होऊनही गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या मेढा आगारातील संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई होणार की नेहमीप्रमाणे हे प्रकरणही दाबले जाणार? असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक आणि प्रवासी विचारत आहेत.



