गोकूळ प्राथमिक शाळेची माजी विद्यार्थिनी सुमती कदम हिची भारतीय वनसेवेत उत्तुंग झेप; राज्यात दुसरी, देशात २६ वी रँक! कृष्णानगर.

गोकूळ प्राथमिक शाळेची माजी विद्यार्थिनी सुमती कदम हिची भारतीय वनसेवेत उत्तुंग झेप; राज्यात दुसरी, देशात २६ वी रँक!
कृष्णानगर.
सातारा जिल्हा बाल विकास समिती संचलित ‘गोकूळ प्राथमिक शाळा’ पुन्हा एकदा अभिमानाने उजळून निघाली आहे. शाळेची माजी विद्यार्थिनी, सुमती यशवंत कदम हिने प्रतिष्ठित भारतीय वनसेवा (IFS) परीक्षेत देशात २६ वी आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दुसरी रँक मिळवून गगनभरारी घेतली आहे. तिच्या या यशाने सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शैक्षणिक यशाचा सातत्यपूर्ण प्रवास:
सुमतीचे प्राथमिक शिक्षण गोकूळ प्राथमिक शाळा, कृष्णानगर येथे झाले. सुरुवातीपासूनच अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या सुमतीने सातवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 2006 साली जिल्ह्यात सहावा क्रमांक पटकावला होता. दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के आणि बारावीत ८८ टक्के गुण मिळवून आपले गुणवंतपण सिद्ध केले होते. त्यानंतर तिने बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून B.Tech (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) ही पदवी पूर्ण केली.
संघर्ष आणि जिद्द:
सुमतीचे वडील यशवंत कदम हे सेवानिवृत्त अकाउंटंट आहेत आणि आई गृहिणी आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या सुमतीने कधीही परिस्थितीचे भांडवल केले नाही. कष्टाची आणि जिद्दीची जोड देत तिने हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, भारतीय वनसेवेत निवड होण्यापूर्वी तिने बृहन्मुंबई महानगरपालिकेत १० वर्षे सेवा दिली आहे. नोकरी सांभाळून, प्रचंड मेहनत आणि अभ्यासातील सातत्य याच्या जोरावर तिने हे मोठे यश मिळवले आहे.
भविष्यातील स्वप्न आणि अभिनंदन:
एका इंजिनिअरिंग पदवीधर मुलीने वनसेवेत घेतलेली ही झेप अत्यंत कौतुकास्पद आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि देशाच्या वनसंपदेचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने तिने हे क्षेत्र निवडले आहे.सुमतीच्या या देदीप्यमान यशाबद्दल गोकूळ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, व्यवस्थापन समिती आणि कृष्णानगर येथील ग्रामस्थांनी तिचे मनापासून अभिनंदन केले आहे. “गोकूळ शाळेच्या मातीत शिकलेल्या विद्यार्थिनीने आकाशात अशी उत्तुंग झेप घेतल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तिचे हे यश शाळेतील इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,” अशा भावना शाळेकडून व्यक्त करण्यात आल्या. सुमती कदम हिच्या पुढील वाटचालीस ‘गोकूळ’ परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा!

सातारा जिल्हा बाल विकास समितीच्या अध्यक्षा श्रीम. शकुंतला कासट उपाध्यक्ष श्री सागर प्रभाळे, सचिव श्री. विनोद कुलकर्णी सर्व संचालक मंडळ, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. निलम पाटील, मुख्याध्यापिका सौ. मिनल खटावकर, बालवाडी प्रमुख सौ. संध्या महामूलकर यांच्यासह पदवीधर शिक्षक सौ. वर्षालता धनावडे, श्री. रामदास चौगुले, श्रीम. सुवर्णा काळे, श्री. संजय सावंत, श्री. शशिकांत चव्हाण, सौ. चित्रा शिंदे, कु. जयश्री घेवदे सुनिता निकम व फुलाबाई अडागळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



