निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील यांना मारहाण झाल्याचे वृत्त निराधार.
निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील यांना मारहाण झाल्याचे वृत्त निराधार...काहींकडून चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित

निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील यांना मारहाण झाल्याचे वृत्त निराधार…काहींकडून चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित साताऱ्यातील राजपथ परिसरातील ‘डंका’ फास्ट फूड जॉईंट येथे गुरुवारी (१७ जुलै) रात्री घडलेल्या घटनेबाबत काही प्रसारमाध्यमांतून चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील हे रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास त्यांचे मित्र अमर मोरे यांच्यासह राजपथ येथील ‘डंका’ फास्ट फूड जॉईंटमध्ये अल्पोपहारासाठी गेले होते. त्यावेळी दुकानातील कर्मचारी आणि एका मद्यधुंद व्यक्तीमध्ये वाद सुरू असून त्याचे रूपांतर मारामारीत झाले होते.
घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती, मात्र कोणीही हस्तक्षेप करत नव्हते.सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये आणि सुरू असलेला वाद थांबावा या उद्देशाने निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी पुढाकार घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी संबंधित मद्यधुंद व्यक्ती आणि त्याच्या सहकाऱ्याने त्यांच्याशी हुज्जत घालत झटापट करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, श्री. पाटील यांनी स्वतः सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हेत्रे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन संबंधित वाद घालणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.



