Uncategorized

सातारा तालुका पोलीस आणि मर्ढे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे दारूच्या नशेत कृष्णा नदीत वाहून जाणाऱ्या इसमाचे वाचले प्राण!

सातारा तालुका पोलीस आणि मर्ढे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे दारूच्या नशेत कृष्णा नदीत वाहून जाणाऱ्या इसमाचे वाचले प्राण!

सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे मर्ढे येथे कृष्णा नदीला आलेल्या पुरात वाहून जाणाऱ्या एका इसमास पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावून सुखरूप बाहेर काढले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे आणि सतर्कतेमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले असून, परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

मौजे मर्ढे (ता. जि. सातारा) येथील मर्ढे आणि आणेवाडी गावांना जोडणाऱ्या पुलावरून सध्या कृष्णा नदीचे पाणी ओसांडून वाहत आहे. या पुलाच्या शेजारी असलेल्या स्मशानभूमीच्या पलीकडे, शिवाजी शिंगटे (रा. मर्ढे) हा इसम दारूच्या नशेत असताना अचानक पाय घसरून नदीच्या वेगवान प्रवाहामध्ये पडला आणि वाहून जाऊ लागला.
जीवाची बाजी लावून केले प्राणरक्षक कार्य.

सदर पुलावर आपत्कालीन परिस्थितीसाठी बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस हवालदार आशिष कुमठेकर, पोलीस शिपाई प्रसाद शिंदे, होमगार्ड करण मोरे आणि किरण खवले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ धाव घेतली. तसेच गावाच्या सरपंच सविता शिंगटे, उपसरपंच विक्रम शिंगटे आणि पोलीस पाटील महेश रोकडे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नदीच्या पाण्यातून सदर इसमास सुखरूप बाहेर काढले.

सुरक्षा उपाययोजना म्हणून या घटनेनंतर सातारा तालुका पोलिसांच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून पुलाच्या परिसरात योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेटिंग करण्यात आले असून, नदी परिसरात व पुलावर न जाण्याबाबतचे सूचनाफलकही लावण्यात आले आहेत. नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

“पूरपरिस्थिती पाहता पोलीस कर्मचारी आणि होमगार्डना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. मर्ढे येथील घटना पाहता कर्मचाऱ्यांनी व ग्रामस्थांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे. नागरिकांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे.”
— निलेश तांबे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलीस ठाणे. यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button