पत्रकार म्हणजे दलाल…” महाबळेश्वर बसस्थानकात वाहतूक निरीक्षकाची मुजोरी; प्रवाशांसमोरच पत्रकारांना जाहीर धमकी!
एसटी उशिरा आल्याचा जाब विचारला म्हणून 'अधिकारी' भडकला! महाबळेश्वरमध्ये पत्रकारांसोबत भरचौकात दादागिरी!

प्रवासी व पत्रकारांशी उद्धट वर्तनाचा आरोप प्रवाशांची गैरसोय; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागण
महाबळेश्वर : महाबळेश्वर एसटी बस स्थानकातील एका वाहतूक निरीक्षकाच्या अरेरावी आणि उद्धट वर्तनामुळे प्रवासी तसेच पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बससेवेतील विलंबाबाबत विचारणा करणाऱ्या प्रवाशांना समाधानकारक उत्तर देण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्याने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ३.३० वाजता सुटणारी एसटी बस तब्बल एक तास उशिराने रवाना करण्यात आली. या विलंबामुळे अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. काही प्रवाशांचे पुढील प्रवासाचे आरक्षण असल्याने त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. बस उशिरा का सुटत आहे, याबाबत प्रवाशांनी संबंधित वाहतूक निरीक्षकाकडे विचारणा केली असता वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
याच बसमधून प्रवास करणाऱ्या एका पत्रकाराने प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत संबंधित अधिकाऱ्याकडे माहिती विचारली. मात्र, पत्रकारांशीही असभ्य व उद्धट भाषेत संवाद साधत अपशब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी याच विभागाच्या चांगल्या कामकाजाची दखल घेत पत्रकारांनी सकारात्मक प्रसिद्धी दिली होती. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याच्या वर्तनाबाबत अधिक आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बस स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी जबाबदारीच्या पदावर कार्यरत असताना प्रवासी व माध्यम प्रतिनिधींशी सन्मानपूर्वक वागणे अपेक्षित असते. मात्र घडलेल्या प्रकारामुळे एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी तसेच दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी, पत्रकार आणि नागरिकांमधून होत आहे. आता एसटी प्रशासन या घटनेकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



