महाराष्ट्र

सातारा परिसरात दहशत माजवणारी ‘डीडी गँग’ दोन वर्षांसाठी तडीपार; पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय

सातारा परिसरात दहशत माजवणारी ‘डीडी गँग’ दोन वर्षांसाठी तडीपार; पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय

 

​सातारा: सातारा शहरासह शाहूपुरी परिसरात शरिराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे करून सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुप्रसिद्ध ‘डीडी गँग’वर सातारा पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. टोळी प्रमुख धैर्यशिल उर्फ धिरज जयसिंग ढाणे याच्यासह टोळीतील एकूण सहा सदस्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

​या टोळीमध्ये युवराज सुरेश मुरारी, साद अय्याज बागवान, प्रसन्न नारायण दिक्षीत, योगेश उर्फ बॉबी भिमराव देवकर आणि प्रितम सोमनाथ साळुंखे या सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. या टोळीवर खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगणे, विनयभंग, घरामध्ये घुसून मारहाण करणे आणि दंगल घडवणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार अटक आणि प्रतिबंधक कारवाया करूनही या टोळीने आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या, ज्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर उपद्रव निर्माण झाला होता.

​शाहूपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन म्हेत्रे यांनी या टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता, ज्याची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी केली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सुनावणी घेऊन या टोळीला जिल्ह्याबाहेर काढण्याचे आदेश दिले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध मोक्का आणि एमपीडीए सारख्या कडक कारवाया सुरूच राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि शाहूपुरी पोलीस पथकाने या कारवाईसाठी आवश्यक पुरावे सादर करून सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button