स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची मोठी कारवाई
स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची मोठी कारवाई: अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणारे बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त; १७ जण गजाआड.

स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची मोठी कारवाई: अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणारे बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त; १७ जण गजाआड अमेरिकन नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. कोरेगाव (जि. सातारा) येथे सुरू असलेले बोगस कॉल सेंटर पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केले असून, याप्रकरणी १७ जणांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
सातारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटर्सवर लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी एक विशेष पथक तयार केले होते.२२ मे २०२६ रोजी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, कोरेगाव ते रहिमतपूर रोडवरील सुभाषनगरमधील ‘रिलायबल अपार्टमेंट’मध्ये ‘श्रीसाई लॉजिस्टिक्स ॲन्ड कन्सल्टंट्स’च्या नावाने एक बोगस कॉल सेंटर चालवले जात आहे. हे केंद्र फेब्रुवारी २०२६ पासून कार्यरत होते.
फसवणुकीची पद्धत (Modus Operandi):
पोलिसांनी २३ मे २०२६ रोजी पहाटे छापा टाकला असता, तिथे १७ पुरुष व ४ महिला बेकायदेशीररित्या कॉल सेंटर चालवताना आढळले. ही टोळी अमेरिकन नागरिकांना ऑनलाईन ॲपद्वारे संपर्क साधत असे. “तुम्ही ॲमेझॉनवरून एक वस्तू ऑर्डर केली आहे,” असे सांगून त्यांना घाबरवले जात असे. समोरच्या व्यक्तीने ऑर्डर नाकारल्यास, त्यांना बनावट मेसेज आणि ऑर्डर क्रमांक पाठवून संभ्रमात टाकले जाई. त्यानंतर, “तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट’ केले जाईल,” अशी भीती घालून गिफ्ट व्हाउचरच्या माध्यमातून डॉलर्समध्ये रक्कम उकळली जात होती.
अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी:
याप्रकरणी पोलिसांनी १७ आरोपींना अटक केली आहे, ज्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) सागर हरिश्चंद्र सुर्यवंशी (वय ३३ – कॉल सेंटर मालक), २) विरेंद्र विनोद बोडरे (वय २७), ३) अक्षय रामचंद्र भंडारी (वय २८), ४) गुरुप्रसाद प्रताप राणे (वय ३१), ५) मनिष दिनेश जोशी (वय २८), ६) शमशुद्दीन सफाट सय्यद (वय ३८), ७) गौरव भानुदास लांडगे (वय २५), ८) अभिषेक संजय गुप्ता (वय २३), ९) इशांत संजय खांडेकर (वय २५), १०) रितेश चंद्रेश चौहाण (वय २६), ११) बाबू व्यंकटेश चलवादी (वय २९), १२) अवि अजय वानखेडे (वय २४), १३) दिपक सुनिल खंडारे (वय २५), १४) मोहंमद शफिक सलीम कोकणे (वय २८), १५) ओमकार संजय घार्गे (वय २४), १६) दिपेन विवेक जाधव (वय २५), १७) लेबीन लारसन सायमन (वय २४).
कोरेगाव पोलीस ठाण्यात या १७ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२), ३१८(४), ६१(१), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(क) व ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथकाची कामगिरी:
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व त्यांच्या विशेष पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी यशस्वीपणे पार पाडली.



