उंब्रज पोलिसांची मोठी कारवाई; बेड्यांसह पळालेला बलात्काराचा आरोपी ३६ तासांत पुण्यातून जेरबंद
उंब्रज पोलिसांची मोठी कारवाई; बेड्यांसह पळालेला बलात्काराचा आरोपी ३६ तासांत पुण्यातून ताब्यात.

पोलीस गाडीचा अपघात झाल्याची संधी साधून हातातील बेड्यांसह ऊसाच्या शेतातून पसार झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात उंब्रज पोलिसांना यश आले आहे. अनिकेत प्रकाश लोहार असे या आरोपीचे नाव असून, उंब्रज पोलीस आणि कराड तालुका डी.बी. पथकाने सलग ३६ तास थरारक पाठलाग करून त्याला पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पुणे येथून ताब्यात घेतले.
नेमकी घटना काय?
अनिकेत लोहार याला अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याला घेऊन जात असताना उंब्रज पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. अपघातानंतर पोलीस कर्मचारी गाडीतून खाली उतरले, नेमकी याच संधीचा फायदा घेत आरोपीने हातातील बेड्यांसह धूम ठोकली. जवळच असलेल्या ऊसाच्या शेतात तो शिरल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
३६ तासांचे सर्च ऑपरेशन आणि अटक
आरोपी पसार झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती. सहायक पोलीस निरीक्षक बिराजदार आणि कराड तालुका गुन्हे शोध पथकाने (D.B. Team) तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. अखेर पुणे येथे सापळा रचून गुरुवारी पहाटे ३ वाजता त्याला पुन्हा बेड्या ठोकण्यात आल्या.
या यशस्वी कारवाईमुळे उंब्रज पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे. अपघातासारख्या कठीण प्रसंगातही पोलिसांनी हार न मानता अवघ्या ३६ तासांत आरोपीला पुन्हा गजाआड केले आहे.



