नगरसेवक होताच मनमानी कारभार सुरू;अनधिकृत होर्डिंगबाजीवरून साताऱ्यात धुमशान
अनधिकृत होर्डिंगबाजीवरून साताऱ्यात धुमशान; नगरसेवकांवर कारवाईसाठी आत्मदहनाचा इशारा

सातारा नगरपरिषदेच्या हद्दीत प्रशासकीय आदेशांना केराची टोपली दाखवत सुरू असलेल्या अनधिकृत होर्डिंगबाजीचा मुद्दा आता टोकाला पोहोचला आहे. प्रभाग क्रमांक १७ मधील नवनिर्वाचित नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी नियमांचे उल्लंघन करून लावलेल्या फ्लेक्सवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा येत्या २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अजय संजय पार्टे यांनी दिला आहे. या इशाऱ्यामुळे पालिकेसह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचनेनुसार २३ डिसेंबर रोजी एका जाहीर निवेदनाद्वारे शहरातील अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स आणि बॅनरवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश हवेत विरतात न विरतात तोच प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी प्रशासकीय नियमांना हरताळ फासल्याचे समोर आले आहे. या प्रभागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फलकबाजी करून प्रशासनाला आव्हान देण्यात आल्याचा आरोप अजय पार्टे यांनी केला आहे.
या संदर्भात अजय पार्टे यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनीच कायद्याचा भंग केल्याने त्यांच्यावर आणि त्यांना शुभेच्छा देणाऱ्या समर्थकांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जर २६ जानेवारीपर्यंत प्रशासनाने यावर कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, तर आत्मदहन करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे सातारा नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही या पत्राद्वारे देण्यात आला आहे. दरम्यान, या पत्राची दखल घेऊन प्रशासन आता अनधिकृत होर्डिंगवर बुलडोझर फिरवणार का, याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.



