महाबळेश्वर पंचायत समितीत ACB ची कारवाई; दोन लोकसेवक रंगेहाथ अटक
महाबळेश्वर पंचायत समितीत ACB ची कारवाई; दोन लोकसेवक रंगेहाथ अटक

पंचायत समितीत लाच मागणी करणाऱ्या दोन लोकसेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी मंगळवारी (२६ नोव्हेंबर) सापळा रचून रंगेहाथ पकडले. या कारवाईत विस्तार अधिकारी आणि तालुका व्यवस्थापक अशा दोघांना मिळून १६,५०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.
अटक केलेले आरोपी असे :
सुनिल संभाजी पारठे (वय ५०), पद – विस्तार अधिकारी, पंचायत समिती महाबळेश्वर
ओंकार संतोष जाधव (वय २७), पद – तालुका व्यवस्थापक (Assk BM), आपले सरकार सेवा केंद्र, पंचायत समिती महाबळेश्वर
तक्रारदारास सोईस्कर ग्रामपंचायतीचा चार्ज देण्यासाठी बीडीओकडे शिफारस करण्याच्या बदल्यात १०,000 रुपये तसेच दरमहा ‘प्रोटोकॉल’ म्हणून ५,००० रुपये अशी एकूण १५,००० रुपयांची लाच विस्तार अधिकारी पारठे यांनी मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.
तर ग्रामपंचायतीचे दफ्तर व ऑनलाईन कामकाज क्लोज करण्यासाठी १,५०० रुपयांची लाच तालुका व्यवस्थापक जाधव यांनी मागितल्याचे आढळले.
ACB ने पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला असता, पारठे यांनी १५,००० रुपये आणि जाधव यांनी १,५०० रुपये तक्रारदाराकडून पंचासमक्ष स्वीकारले. त्यानंतर दोघांना ACB पथकाने ताब्यात घेतले.
दोघांविरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाई पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पो.नि. सुप्रिया गावडे तसेच पथकातील नितीन गोगावले, निलेश राजपूरे, निलेश चव्हाण व अजयराज देशमुख यांनी ही कारवाई केली. तपास पो.नि. सुनिल दाजी पाटील करीत आहेत.
लाच मागणीबाबत नागरिकांनी ACB सातारा कार्यालयाशी किंवा १०६४ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



