रात्रीच्या अंधारात परप्रांतीय भंगार व्यवसायिकांकडून वाहतुकीचा ‘खेळ’?
रात्री दहा-बारानंतर वाहनांची वाढते मोठी वर्दळ? प्रशासनाने वाहनांची तपासणी करून सत्य बाहेर काढण्याची स्थानिकांची मागणी.

कुडाळ प्रतिनिधी प्रसन्ना पवार
जावळी तालुक्याच्या हद्दीत सुरू असलेल्या कथित विनापरवाना भंगार व्यवसायाभोवती आता अनेक गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.कुडाळसह पंचक्रोशीतील असणाऱ्या परप्रांतीयांच्या भल्यामोठ्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार साठविले जात असून,दररोज रात्री दहा ते बारानंतर या ठिकाणाहून मोठ्या वाहनांमधून भंगाराची वाहतूक खुलेआमपने स्थानिक प्रशासनाच्या नाकावर टिचून केली जात असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे.या वाहनांमधून २० टनांपेक्षा अधिक भंगाराची वाहतूक होत असल्याचीही चर्चा असून,त्यामध्ये चोरीचे साहित्य असल्याचा संशय शेतकरी व नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
या संपूर्ण प्रकाराची प्रशासनाने स्वतंत्रपणे चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
तसेच स्थानिकांच्या म्हणण्यानुसार,दिवसभर भंगार साठविण्याची लगबग आणि रात्री उशिरा त्याची वाहतूक होत असते.विशेषतः रात्री दहा ते बारानंतर संबंधित वाहनांची ये-जा वाढत असल्याचा दावा स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी केला आहे.तसेच या वाहनांमधून नेमका कोणता माल वाहून नेला जातो,त्याचा स्रोत काय आहे आणि तो कुठे पाठविला जातो, वाहनांमध्ये भरलेल्या भंगार साहित्याच्या खाली दुसरा कोणता तर माल नसतो ना? याची अधिकृत चौकशी होणे आवश्यक असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.तसेच संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगाराचा साठा केला जात असल्याची चर्चा असून २० टनांपेक्षा अधिक भंगाराची वाहतूक होत असल्याचा दावा खरा असल्यास,एवढ्या मोठ्या प्रमाणातील मालाचा खरेदी-विक्रीचा हिशेब काय? माल कोणाकडून खरेदी केला जातो? त्याची बिले आहेत का? वाहतूक कागदपत्रे आहेत का? मालाची नोंद ठेवली जाते का? याची तपासणी होणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे भंगारामध्ये तांबे,विद्युत साहित्य,लोखंडी साहित्य व इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश असल्याची चर्चा असून,यातील काही साहित्य चोरीचे तर नाही ना? असा संशय स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.विशेषतःविद्युत वाहिन्या,केबल,तांबे किंवा अन्य सार्वजनिक मालमत्तेशी संबंधित साहित्य आढळल्यास त्याचा स्रोत तपासणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.तसेच परप्रांतीय भंगार व्यवसायिकांकडून भंगाराची वाहतूक रात्री होत असल्याचा दावा होत असल्याने प्रशासनाने रात्रीच्या वेळी संबंधित परिसरातून जाणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी करावी.वाहनातील मालाची कागदपत्रे,वाहनाची वैधता आणि मालाच्या स्त्रोताची माहिती तपासण्यात यावी,आवश्यक असल्यास वजनकाट्याच्या नोंदी व सीसीटीव्ही फुटेजही तपासावे,अशी मागणी स्थानिक नागरिक व शेतकरी करू लागले आहेत.
त्याचप्रमाणे या प्रकरणाची केवळ भंगार व्यवसाय म्हणून पाहणी न करता महसूल विभाग,ग्रामपंचायत,प्रशासन,महावितरण आणि संबंधित पर्यावरण यंत्रणेने संयुक्त तपासणी करावी,अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात भंगाराची आवक-जावक कशी होते? वाहनांमधील मालाची कागदपत्रे आहेत का? रात्री होणाऱ्या वाहतुकीची नोंद आहे का? तसेच चोरीचे साहित्य असल्याचा संशय असल्यास त्यामागील सत्य काय आहे? या प्रश्नांची उत्तरे तपासणीतून समोर येणे आवश्यक आहे.
तसेच चोरीचे साहित्य या शेडमध्ये ठेवले जाते,असा नागरिकांचा संशय असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
त्यामुळे प्रशासनाने संबंधित शेड,भंगाराचा साठा आणि वाहनांची तपासणी करून भंगार व्यवसायाच्या नावाखाली नेमके काय सुरू आहे,याचा छडा लावावा,अशी मागणी जावळीतील शेतकरी व नागरिकांतून होत आहे.
परप्रांतीय भंगार व्यवसायिकांकडून माल नेमका जातो कुठे?
स्थानिकांकडून व्यक्त होत असलेल्या संशयानुसार, या ठिकाणी जमा होणारे काही भंगार नक्की कोणत्या ठिकाणी अंधाराचा फायदा घेत पाठविला जातो.यामध्ये चोरीचे साहित्य असल्याचा आरोप अद्याप सिद्ध झालेला नसला,तरी संबंधित वाहनांची तपासणी केल्यास या चर्चेमागील वास्तव समोर येणार आहे.त्यामुळे वाहनांचा क्रमांक,चालक,मालाची पावती,वजनकाटा पावती,बिल,ई-वे बिल लागू असल्यास त्याची कागदपत्रे आणि माल कुठून आला-कुठे जात आहे,याची माहिती संबंधित विभागांनी तपासावी,अशी मागणी शेतकरी व स्थानिक रहिवासी करत आहेत.



