Uncategorized

परप्रांतीय भंगार माफियांचा जावलीत धुमाकूळ! घातक कचऱ्याने आरोग्य टांगणीला; प्रशासनाला अल्टीमेटम.

"जावलीत कचऱ्याच्या नावाखाली 'विष'!"; परप्रांतीय व्यावसायिकांचा जीवघेणा उद्योग, ग्रामस्थ आक्रमक.

Part…..3

कुडाळ : प्रतिनिधी प्रसन्न पवार

कुडाळसह परिसरातील गावांमध्ये आवश्यक परवानग्या व नियमांचे पालन न करता परप्रांतीयांकडून भंगार व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. विविध प्रकारचे लोखंडी भंगार,प्लास्टिक,रबर, केमिकलयुक्त साहित्य तसेच इतर कचरा मोठ्या प्रमाणात आणून लोकवस्ती व शेतीच्या परिसरात साठवला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवासी,शेतकरी व ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालय मेढा प्रशासनाकडे निवेदन देत संबंधित भंगार व्यावसायिकांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी व कारवाई करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की काही ठिकाणी भंगार संकलन केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी खुलेआम कचरा जाळला जात आहे.त्यामुळे परिसरात धूर व दुर्गंधी निर्माण होऊन नागरिकांना श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः लहान मुले,ज्येष्ठ नागरिक तसेच श्वसनासंबंधी त्रास असलेल्या व्यक्तींना याचा अधिक धोका निर्माण होऊ शकतो.

तसेच भंगारामध्ये असलेले प्लास्टिक,रासायनिक अवशेष,रबर व इतर घातक घटक जमिनीत मिसळल्यास मातीची गुणवत्ता व सुपीकता कमी होण्याची शक्यता आहे.याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होऊ शकतो.तसेच दूषित पाणी विहिरी,बोअरवेल व इतर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळण्याचा धोका असल्याने भविष्यात पाणीप्रदूषणाची समस्या गंभीर होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

त्याचप्रमाणे लोकवस्ती,शेतजमीन,विहिरी,बोअरवेल व पाण्याच्या स्रोतांच्या परिसरात भंगार साठवले जात असल्यास त्याची प्रशासनाने तातडीने पाहणी करावी,अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्यात भंगारातून वाहून जाणारे दूषित घटक नाल्यांमार्फत नदीमध्ये जाण्याची शक्यता असल्याने जलप्रदूषणाचा धोका नाकारता येत नाही.
तसेच संबंधित व्यावसायिकांकडे भंगार व्यवसायासाठी आवश्यक परवाने आहेत का? व्यवसायाच्या ठिकाणी नियमांनुसार सुरक्षितता व कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था आहे का? भंगार नेमके कुठून आणले जाते आणि त्याची पुढे विल्हेवाट अथवा विक्री कोणत्या पद्धतीने केली जाते? याची प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

भंगारामध्ये प्लास्टिक,रबर व ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्यास आग लागण्याचा धोका वाढतो.अशा ठिकाणी अग्निसुरक्षा साधने,आपत्कालीन मार्ग, पाण्याची उपलब्धता तसेच इतर आवश्यक सुरक्षा उपाय आहेत का, याचीही तपासणी करण्याची गरज आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

तसेच या प्रकरणाची केवळ कागदोपत्री चौकशी न करता पंचायत समिती,ग्रामपंचायत,महसूल,आरोग्य,पाणीपुरवठा व प्रदूषण नियंत्रण यंत्रणेने संयुक्तपणे संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करावी. भंगार साठवणूक,कचरा जाळणे,पाण्याचे प्रदूषण,शेतीवर होणारा परिणाम आणि व्यावसायिक परवान्यांची तपासणी करून अहवाल तयार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तसेच भंगार व्यवसायाच्या ठिकाणी आग,धूर,रासायनिक घटक किंवा इतर घातक साहित्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने संबंधित विभागांनी जोखीम असलेल्या ठिकाणांची यादी तयार करून विशेष तपासणी मोहीम राबवावी.नियमांचे उल्लंघन आढळल्यास नोटीस,दंड व व्यवसाय बंद करण्याची कारवाई करावी.तसेच नागरिकांनी केलेल्या तक्रारींची नोंद घेऊन त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती सार्वजनिक करावी,अशी मागणी महिला वर्गासह,स्थानिक रहिवासी,शेतकरी यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अनधिकृत व्यवसाय तातडीने बंद करण्याची मागणी

नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून अनधिकृत भंगार व्यवसाय बंद करण्यात यावा.तसेच नियमबाह्य पद्धतीने साठवलेले भंगार व कचरा सुरक्षितरीत्या हटवून परिसर स्वच्छ करण्याचे आदेश द्यावेत,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांच्या छोट्या व्यवसायांवर नियमांचा बडगा उगारला जात असताना मोठ्या प्रमाणात भंगार साठवणूक करणाऱ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील.

पल्लवी अजय वारागडे

शेतकरी कुडाळ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button