Uncategorized

‘गाव तेथे शाखा’ उपक्रमाला सुरुवात; राजेंद्र कोंढरे यांच्या उपस्थितीत समाज संघटन, शेतजमीन संवर्धन आणि युवकांच्या प्रश्नांवर भर.

प्रतिनिधी/ श्रीकांत गोळे.

रिटकवली, ता. जावळी, जि. सातारा प्रतिनिधी : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यातील रिटकवली येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जावळी तालुक्यातील पहिल्या कार्यालयाचे तसेच गाव शाखेचे भव्य उद्घाटन मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ‘गाव तेथे शाखा’ या उपक्रमांतर्गत झालेल्या या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्यामुळे जावळी तालुक्यातील मराठा समाजामध्ये नवचैतन्य निर्माण होउन संघटनात्मक वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे.
आई महाकाली मंदिर, रिटकवली येथे झालेल्या या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते कार्यालय व शाखेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील तसेच बाळासाहेब साळवी सातारा जिल्हा कार्याध्यक्ष होते.

यावेळी जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रिटकवली व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साताऱ्याची ओळख आणि मराठा समाजाची जबाबदारी

सातारा ही केवळ ऐतिहासिक भूमी नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वाभिमानाची भूमी आहे. अफझलखानाच्या अजस्त्र सैन्याला पराभूत करून शत्रूला धूळ चारणाऱ्या शौर्याची साक्ष देणारी, छत्रपतींची गादी असणारी, मातृभूमीच्या संरक्षणासाठी शूर सैनिक देणारी आणि निसर्गसौंदर्याने नटलेली ही भूमी आहे. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, हिरवेगार डोंगर, लाल माती आणि मनाने श्रीमंत असलेली माणसे ही सातारा जिल्ह्याची खरी ताकद असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

कै. अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

शेतजमिनी विकू नका; पुढील पिढ्यांसाठी जमीन जपा’

कार्यक्रमात ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या होत असलेल्या विक्रीबाबतही महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. “शेतजमिनी विकू नका. जमिनीचे नैसर्गिक, व्यावसायिक आणि पर्यावरणीय मूल्य लक्षात घेऊन हाती असलेली जमीन जपा,” असे आवाहन करण्यात आले.

जावळीच्या डोंगररांगा, लाल माती, पाणी, जंगल आणि शेती ही केवळ संपत्ती नसून पुढील पिढ्यांची जीवनरेखा आहे. त्यामुळे विकास आणि रोजगाराच्या संधी निर्माण करताना निसर्ग व शेतीचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राजेंद्र कोंढरे यांनी जागविल्या जुन्या आंदोलनाच्या आठवणी

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी आपल्या सामाजिक चळवळीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. सन १९९० च्या दरम्यान एका गावात झालेल्या अन्यायाविरोधात रात्री नऊ वाजता मेढा पोलीस ठाण्यावर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रभाकर दुर्गे, रंगनाथ गोडगे पाटील, राजेंद्र थोरात, विठ्ठल खोपडे यांच्यासह पुण्याहून तब्बल ११० किलोमीटर स्कूटरवरून प्रवास करून मोर्चा काढल्याची आठवण त्यांनी सांगितली.

अन्यायाविरोधात आवाज उठविणे, समाजाच्या प्रश्नांसाठी एकत्र येणे आणि संघटितपणे लोकशाही मार्गाने लढा देणे हीच समाजाची खरी ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युवक, विद्यार्थी, महिला व शेतकऱ्यांसाठी कार्यालय ठरणार मार्गदर्शन केंद्र

रिटकवली येथे सुरू झालेले हे कार्यालय जावळी तालुक्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाचे पहिले कार्यालय असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हे कार्यालय केवळ संघटनेच्या बैठकीपुरते मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांसाठी मार्गदर्शन, संवाद आणि सहकार्याचे केंद्र बनविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांची माहिती, शासनाच्या विविध योजना व सवलती, युवकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी, शेतकऱ्यांना उपलब्ध योजना, महिलांसाठी विविध उपक्रम तसेच आर्थिकदृष्ट्या गरजू समाजबांधवांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे, यासाठी कार्यालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार

समाजातील आरक्षण, शैक्षणिक सुविधा, प्रशासकीय अडचणी आणि विविध सामाजिक प्रश्नांवर योग्य माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. गावागावांत बैठकांचे आयोजन करून समाजातील सर्व घटकांना संघटित करण्याचा मानसही यावेळी व्यक्त करण्यात आला.

‘गाव तेथे शाखा’ उपक्रमातून संघटन विस्ताराचा निर्धार

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सातारा जिल्ह्याच्या वतीने ‘गाव तेथे शाखा’ हा उपक्रम राबविण्यात येत असून, रिटकवली येथून जावळी तालुक्यात या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार करण्यात आला. आगामी काळात तालुक्यातील विविध गावांमध्ये शाखा स्थापन करून समाजातील युवक, महिला, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

समाजाच्या हक्कांसाठी लोकशाही आणि संविधानिक मार्गाने लढा देतानाच सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सर्व समाजघटकांमध्ये एकोपा कायम ठेवण्यावर भर देण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास विवेकानंद बाबर, जितेंद्र भोसले, विलास बाबा जवळ, ह.भ.प. अतुल महाराज देशमुख, , शंकरराव जांभळे,अनिल करंदकर, बजरंग दादा वांगडे, संदीप माने, सौ. छायाताई भोसले,शेखर जाधव, बजरंग चौधरी यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

तसेच API हिम्मत दबडे पाटील, .अमर पवार राकेश गायकवाड, अँड तेजेश घोरपडे, जीवन पवार, प्रविण वीर, तुकाराम यादव, अंकुश पवार आनंदराव पवार गुलाबराव गायकवाड सुनील पवार संजय पवार यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री अनिल करंदकर सातारा जिल्हा उपाध्यक्ष (जावली, वाई विभाग) तसेच जावळी तालुकाध्यक्ष सुनील धनावडे, , समाजसेवक उपाध्यक्ष नामदेव मर्डेकर, संतोष महामुलकर तसेच महेश मर्ढेकर,श्रीकांत गोळे

बजिरंग वांगडे, अनिल केसकर,तसेच तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी, सभासद, सदस्य आणि रिटकवली मंडळाने विशेष परिश्रम घेतले.

रिटकवली येथे सुरू झालेले अखिल भारतीय मराठा महासंघाचे हे पहिले कार्यालय जावळी तालुक्यातील समाज संघटनाला बळ देणारे ठरणार असून, “एकजूट, सामाजिक बांधिलकी, युवकांचे सक्षमीकरण आणि पुढील पिढीसाठी जमीन व निसर्गाचे संवर्धन” या व्यापक उद्देशाने महासंघाची वाटचाल सुरू राहणार असल्याचा निर्धार यावेळी जावली तालुका अध्यक्ष सुनिल धनावडे व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button