कागदावरच शिक्षणाचा दर्जा? जावळी तालुक्यातील शाळांमध्ये सुविधांची बोंबाबोंब; प्रशासनाविरोधात संतापाची लाट!
जावळी तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेकडे गांभीर्याने पहा! — सरपंच गणेश जगताप यांची रोखठोक मागणी

प्रतिनिधी:- श्रीकांत गोळे.
शाळांमध्ये सुविधांची बोंबाबोंब आणि दुसरीकडे शिक्षक व्यवस्थेतील विसंगती — जावळी तालुका नेमका कोणत्या दिशेने चालला आहे?
जावळी तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शौचालय, पाणी, स्वच्छता, इमारत व इतर मूलभूत सुविधांच्या समस्या आजही कायम आहेत. त्यातच शिक्षकांच्या उपलब्धतेचेही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
एकीकडे पटसंख्या कमी असलेल्या शाळांमध्ये गरजेपेक्षा जास्त शिक्षक उपलब्ध असण्याची परिस्थिती, तर दुसरीकडे पटसंख्या टिकवून ठेवणाऱ्या, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता जाणवते. ही विसंगती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित आहे.
शिक्षकांची संख्या ठरवताना केवळ कागदावरील आकडे न पाहता प्रत्यक्ष शाळेची पटसंख्या, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, भौगोलिक परिस्थिती आणि शैक्षणिक गरज यांचा विचार झाला पाहिजे.ज्या शाळा विद्यार्थी टिकवून ठेवत आहेत, गुणवत्तापूर्ण निकाल देत आहेत, त्या शाळांना पुरेसे शिक्षक व आवश्यक सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.आणि ज्या शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे, तिथेही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये; मात्र मनुष्यबळाचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे.
आज प्रश्न केवळ एका शाळेच्या शौचालयाचा नाही, तर संपूर्ण जावळी तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेच्या नियोजनाचा आहे.इतकी वर्षे या समस्या समोर येत असताना प्रशासन आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने का पाहिले नाही?फक्त कागदावर योजना, निधी आणि आकडेवारी दाखवून शिक्षण व्यवस्था सक्षम होत नाही. प्रत्यक्ष शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांना काय अडचणी आहेत, हे पाहण्यासाठी अधिकारी प्रत्यक्ष शाळेत गेले पाहिजेत.

जिथे विद्यार्थी आहेत तिथे शिक्षक हवेत,
जिथे गरज आहे तिथे सुविधा हव्यात,
आणि जिथे गुणवत्ता आहे तिथे प्रोत्साहन हवे!”
जावळी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे.आता तरी प्रशासनाने जागे होऊन शाळानिहाय वास्तव परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य निर्णय घ्यावा, ही अपेक्षा. ग्रामपंचायत भणंग लोकनियुक्त सरपंच गणेश साईबाबा जगताप.



