खाकीवर पुन्हा हल्ला! सुरूरमध्ये भुईंज पोलिसांच्या ‘डीबी’ कर्मचाऱ्यावर भ्याड हल्ला; कर्मचारी गंभीर जखमी
सुरूरमध्ये भुईंजच्या 'डीबी' कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; वाई तालुक्यात खळबळ.

वाई तालुक्यातील सुरूर येथे रविवारी मध्यरात्री गस्तीदरम्यान भुईंज पोलिस ठाण्याच्या डीबी (डिटेक्शन ब्रांच) विभागातील पोलिस कर्मचारी किरण निंबाळकर यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर वाई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सातारा जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पीएसआय सूरज शिंदे, पोलिस कर्मचारी किरण निंबाळकर आणि होमगार्ड शेख हे परिसरात रात्रगस्त घालत होते. त्यावेळी सुरूर गावातील दावजी पाटील मंदिराजवळील माळरानावरील फासेपारधी वस्तीवर बाहेरगावाहून आलेल्या काही अज्ञात व्यक्ती हल्ला करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. तेव्हा भीतीपोटी वस्तीतील अनेक महिला सुरूर गावात आश्रयासाठी गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिस परिसराची पाहणी करत असताना तेथे तीन संशयित व्यक्ती दिसल्या. त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्यापैकी एका संशयिताने धारदार शस्त्राने किरण निंबाळकर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
जखमी निंबाळकर यांना तातडीने उपचारासाठी वाई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर संशयितांचा शोध घेण्यासाठी भुईंज पोलिसांसह सातारा स्थानिक गुन्हे शाखेची (एलसीबी) विशेष पथके रवाना झाली असून पुढील तपास सुरू आहे.



