पाटण शिक्षक सोसायटीचा ‘दरोडा’! संमतीविना सभासदत्व अन् पगारातून १,६०० रुपयांची डल्लामारी; डी.डी.आर. चौकशीची मागणी!
मास्तरांच्या संमतीविनाच 'वर्गणी'चा दणका! पाटण शिक्षक सोसायटीतील घोटाळा चव्हाट्यावर; चौकशीचा बडगा उगारण्याची मागणी!

प्रतिनिधी पाटण
पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या कारभारावरून शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, संचालक मंडळाच्या कथित अनागोंदी कारभाराची सहकार विभागाच्या उपनिबंधक (डी.डी.आर.) कार्यालयामार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी शिक्षक संघटना आणि सभासदांनी केली आहे. सभासदांची लेखी संमती न घेता परस्पर सभासद नोंदणी करून शिक्षकांच्या खात्यातून तब्बल १,६०० रुपयांची वर्गणी कपात केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
शाखा विस्ताराला यापूर्वीच अनेक सभासदांनी विरोध केला असतानाही त्यांच्या इच्छेला केराची टोपली दाखवून काही शिक्षकांना परस्पर सभासद केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे निलंबित शिक्षकांच्या खात्यातूनही वर्गणी कपात झाल्याचा दावा करण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. सभासदांच्या परवानगीशिवाय आर्थिक व्यवहार होत असतील, तर भविष्यात संबंधित शिक्षकांच्या नावावर कर्ज व्यवहार झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार , असा संतप्त सवाल सभासदांनी उपस्थित केला जात आहे.

‘सहकाराच्या नावाखाली शिक्षकांच्या पैशांशी खेळ खपवून घेणार नाही,’ असा इशारा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. तर डी.डी.आर.मार्फत निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, संमती विना कपात केलेली रक्कम तात्काळ परत करावी आणि सभासदांच्या इच्छे विरोधातील शाखा विस्ताराचा निर्णय रद्द करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
या मागणीला शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत कांबळे, भारत देवकांत, तालुका अध्यक्ष बंडू पवार, आनंद चाळके, तानाजी पवार, राजू पवार, सुधीर जाधव, राजेंद्र बोडके, धनराज अडसूळे, विजय खांडके, राहुल खैरमोडे, श्रीरंग चव्हाण, सागर पाटोळे, विजय चाळके, विजय शेलार, उमेश पाटील यांच्यासह अनेक माजी पदाधिकारी व सभासदांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येणारी वार्षिक सभा वादळी ठरण्याची चिन्हे असून, सोसायटीच्या कारभारावर आता डी.डी.आर. चौकशीचे सावट निर्माण झाले आहे.



