बासुंदीला उग्र वास, पॅकिंगवर उत्पादन व मुदतबाह्य दिनांक नसल्याचा आरोप; हेगडे फुड प्रॉडक्ट्सविरोधात आयुक्तांकडे तक्रार.

बासुंदीला उग्र वास, पॅकिंगवर उत्पादन व मुदतबाह्य दिनांक नसल्याचा आरोप; हेगडे फुड प्रॉडक्ट्सविरोधात आयुक्तांकडे तक्रा
सातारा : सातारा शहरातील प्रसिद्ध हेगडे फुड प्रॉडक्ट्सच्या बासुंदीला उग्र वास येत असल्याचा तसेच पॅकिंगवर उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम तारीख आणि घटकांची माहिती नमूद नसल्याचा आरोप करत राहुल आनंदराव जाधव यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी ३० जुलै रोजी तक्रार करूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे जाधव यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
जाधव यांच्या म्हणण्यानुसार, ते ३० जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठेतील हेगडे फुड प्रॉडक्ट्स येथे बासुंदी व सीताफळ रबडी खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना साध्या पिशवीत बासुंदी देण्यात आली. या पॅकिंगवर उत्पादन दिनांक, अंतिम वापराची तारीख तसेच पदार्थामध्ये वापरण्यात आलेल्या घटकांची माहिती नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबत दुकानातील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. घरी आणल्यानंतर बासुंदीला उग्र वास येत असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी त्यांनी सातारा येथील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात ३० जुलै रोजी लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्याप संबंधित हेगडे फुड प्रॉडक्ट्सविरोधात कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उलट संबंधित संस्थेने वकिलामार्फत नोटीस बजावून प्रकरण मिटविण्यासाठी दबाव आणल्याचेही जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, हेगडे फुड प्रॉडक्ट्सचा उत्पादन कारखाना शुक्रवार पेठेतील बदामी विहिरीजवळ ओढ्याशेजारी असून, परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून ३० जुलै रोजी दुपारी १२.३० ते १२.४५ या वेळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, तसेच तक्रारीची प्रत, खरेदीचे बिल आणि संबंधित कागदपत्रांची पाहणी करावी, अशी मागणी जाधव यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केली आहे. दोष आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.



