खंडाळा हद्दीत राडा: कंपनी प्रशासनाकडे बेकायदेशीर माथाडी काम आणि स्क्रॅप कॉन्ट्रॅक्ट मागणाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल; एक जण ताब्यात!
मेटाफोल्ड कंपनीत तोडफोडीची धमकी देऊन 'एचआर'ला मारहाण; खंडाळा पोलिसांत गुन्हा दाखल

खंडाळा (प्रतिनिधी):
खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खाजगी कंपनीच्या प्रशासनाला बेकायदेशीर माथाडी काम आणि स्क्रॅप कॉन्ट्रॅक्ट (भंगारचे कंत्राट) देण्यासाठी धमकावून तोडफोडीचा इशारा देणाऱ्या व विरोध करणाऱ्या अधिकाऱ्याला बेदम मारहाण करणाऱ्या चार जणांवर खंडणी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे औद्योगिक वसाहतीमधील कंपनी चालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील ‘मेटाफोल्ड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमध्ये सध्या डेव्हलपमेंटचे काम सुरू आहे. दि. १३ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:३१ वाजण्याच्या सुमारास, कंपनीचे एच.आर. ऍडमिनिस्ट्रेटर (HR Admin) रामदास बबन भोसले (वय ६३, रा. शिवाजीनगर, खंडाळा) हे कंपनीच्या मेन गेटजवळ थांबले होते.
त्यावेळी काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून (क्र. MH 11 DU 1921) चार अनोळखी इसम कंपनीच्या आवारात आले. त्यांनी थेट काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन क्रेन, डंपर आणि जेसीबीचे काम बंद पाडण्यास सुरुवात केली. “काम बंद करा, नाहीतर आम्ही येथे तोडफोड करू,” अशी धमकी त्यांनी दिली.
यावर फिर्यादी भोसले यांनी, “तुम्ही काम का बंद पाडत आहात?” अशी विचारणा केली असता, आरोपींनी “आम्हाला कंपनीमध्ये लागणारे सर्व बांधकाम, माथाडी कामगार आणि स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट मिळालेच पाहिजे,” अशी बेकायदेशीर मागणी लावून धरली. भोसले यांनी सदर बाब कंपनी प्रशासनाशी निगडीत असून मी यात काही करू शकत नाही, असे सांगताच आरोपींचा पारा चढला.
”तू कंपनीचा मालक झाला आहेस का?” असे म्हणून एका आरोपीने फिर्यादींच्या कानाखाली मारली. इतक्यावरच न थांबता तेथेच पडलेली लोखंडी सळई घेऊन भोसले यांच्या पाठीवर जबर वार केला. तसेच जिवे मारण्याच्या उद्देशाने तेथील दगड उचलून त्यांच्या दिशेने भिरकावला, मात्र भोसले यांनी तो चुकविल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर चारही आरोपी गाडीतून पसार झाले.
याप्रकरणी रामदास बबन भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(५), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३) आणि ३(५) प्रमाणे खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) श्री. संतोष मस्के हे करीत आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन:
”खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीत अशा प्रकारे कोणत्याही कंपनी मालकाला किंवा प्रशासनाला बेकायदेशीर रित्या, माथाडी काम अथवा कंत्राटाच्या नावाखाली कोणी त्रास देत असल्यास किंवा खंडणी मागत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना थारा दिला जाणार नाही,” असे आवाहन फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धन्यकुमार गोडसे आणि खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी संयुक्तपणे केले आहे.



