Uncategorized

प्रगतीचा प्रकाश प्रत्येक घरात पोहोचावा, यासाठी धडपडत राहू. तूर्त इतकंच…संग्राम बर्गे

आपल्या सर्वांचे लाडके संग्राम बर्गे यांचा एक शुभ संदेश......

आपल्या सर्वांचे लाडके संग्राम बर्गे यांचा एक शुभ संदेश……

आपल्या परिसरात आपण सारे अनेक वर्षापासून खांद्याला खांदा लावून वाटचाल करतो आहोत. मला तुमच्या मनःस्थितीची जाणीव आहे. सामूहिक प्रगतीसाठी आपण एक सुंदर मॉडेल निर्माण केलं आणि त्याची सातत्यपूर्ण अंमलबजावणी केली. हे मॉडेल इतकं सर्वस्पर्शी आहे, की समाजाचा प्रत्येक घटकाच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, याची खबरदारी आपण घेतली. हेच मॉडेल संपूर्ण सातारा शहरात राबवण्याची संधी मला मिळावी, म्हणून माता-भगिनींनी देव पाण्यात ठेवले. लहानथोरांनी ईश्वराकडे तशी प्रार्थना केली. तरुण मित्रांबद्दल तर काय बोलावं..! प्रत्येक खाचखळग्यातून माझ्यासोबत न थकता, तक्रार न करता वाटचाल करणाऱ्या या मित्रांनी हातची संधी गेल्यानंतर चक्क अश्रू ढाळले.

पण माझ्या स्नेहीजनांनो, आपल्याला भावनेला बांध घालून पुढे जावं लागेल. माझ्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आणि व्यक्तिसमूहाला न्याय मिळावा, सर्वांची भरभराट व्हावी, प्रत्येकाला योग्यतेप्रमाणं संधी मिळावी, हेच स्वप्न बाळगून आजवर वाटचाल झाली. यापुढेही तेच लक्ष्य राहील. ते साध्य करण्याचं ‘माध्यम’ बदलेल असं माझे सहप्रवासी म्हणून तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे. परंतु तसं झालं नाही म्हणून नाउमेद होण्याचं काय कारण? तुम्ही तेच आहात, मीही तोच आहे, लक्ष्य तेच आहे आणि रस्ताही तोच आहे. माध्यम कोणतंही असो, आपल्याला थांबून चालणार नाही.

आजवर आपल्या वाटचालीत संधीच्या, पदाच्या, साधनांच्या अभावामुळं कधीच खंड पडला नाही. आपले सर्व सामूहिक उपक्रम यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. आदर्श उपक्रम म्हणून या उपक्रमांचे दाखले दिले जातात, हीच आपल्या कामाची पोहोचपावती आहे. संधीची अपेक्षा कधीच न करता डोंगराएवढं काम उभं राहिलं, यामुळे तुमच्या अपेक्षा उंचावणं स्वाभाविक होतं आणि अपेक्षाभंगही स्वाभाविकच आहे. परंतु त्यामुळे आपल्याला डळमळीत होता येणार नाही. माझं कार्यालय त्याच ठिकाणी, त्याच वेगात कार्यरत राहील. आपण तिथे पूर्वीप्रमाणेच नियमित भेटत राहू. सुख-दुःख वाटून घेऊ. आपल्या समस्या सोडवत राहू. महिला उद्योजकांची संख्या वाढती कशी राहील, याचा प्रयत्न करू. सक्षम युवकांना रोजगार मिळावा म्हणून धडपड करु. पद आणि संधी मिळायची तेव्हा मिळेल. तोपर्यंत चालत राहू…

प्रगतीचा प्रकाश प्रत्येक घरात पोहोचावा, यासाठी धडपडत राहू. तूर्त इतकंच…

आपला स्नेहांकित,
– संग्राम बर्गे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button