Uncategorized

गरीबीतून वर आले, पण नियतीने ऐन तारुण्यातच हिरावले;

गरीब कुटुंबात जन्मलेल्या तरुणांनी व्यावसायिक होण्याचे स्वप्न पाहत भागीदारीत मोमो विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता, त्यानंतर काढलेल्या या कोकण सहलीमागील एक भावनिक कारण समोर आले आहे.

पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात थार गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी ५०० फूट खोल दरीत कोसळली. मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना ड्रोनची मदत घ्यावी लागली. हा अपघात रविवारी दुपारी झाल्याचा अंदाज आहे. कोकणात फिरायला गेलेले तरुण परतले नसल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरून ताम्हिणी घाटात शोध घेण्यात आल्यावर अपघात घडल्याचे समोर आले.

ताम्हिणी घाटात थार गाडीला झालेल्या अपघातात प्रथम चव्हाण (वय २२), पुनीत शेट्टी (वय २०), साहिल गोठे (वय २४), ओमकार कोळी (वय १८), शिवा माने (वय १९) आणि श्री कोळी (वय १८) या तरुणांचा मृत्यू झाला. या सहा जणांसह आणखी काही तरुणांनी मिळून उत्तमनगर-कोपरे परिसरात एस. के. मोमोज नावाने मोमोज विक्रीचे दुकान सुरू केले होते. ‘त्यांनी या व्यवसायाचा काही प्रमाणात विस्तारही केला होता. या क्षेत्रातील संधी त्यांनी हेरली होती,’ असे कोंढवे-धावडे येथील स्थानिक नागरिक व प्रथम चव्हाणचे नातेवाइक प्रकाश साळवे यांनी ‘मटा’ला सांगितले.

कुणाचे वडील रिक्षाचालक, कुणाची आई हार विक्रेती
‘साहिलचे वडील रिक्षा, तर प्रथमचे वडील टेम्पो चालवतात. शिवाच्या आईचा पूजेचे साहित्य, हार विक्रीचा व्यवसाय आहे. इतर तरुणही सामान्य कुटुंबातीलच होती. आई-वडिलांना हातभार लावण्याच्या उद्देशाने त्यांनी मोमो विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. यातील काही तरुण शिक्षण घेत व्यवसाय करीत होते. त्यातूनच एका तरुणाने थार गाडी खरेदी केली होती. त्यातून पहिली सहल त्यांनी कोकणात काढली होती. एका वेळी सर्वांना शक्य नसल्याने सहा जण कोकणात निघाले होते, तर त्यांचे इतर मित्र व्यवसायासाठी पुण्यातच थांबले होते,’ असे साळवे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button