Uncategorized

कॉपर वायर व डीपी चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.

बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतीपंपाच्या कॉपर वायर व डीपी (ट्रान्सफॉर्मर) चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश करण्यात बोरगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. संयुक्त कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून 26 गुन्ह्यांची उकल करत 20 लाख 22 हजार 482 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शेतीपंपांच्या कॉपर वायर आणि डीपी चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके व बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांना तपासाच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार बोरगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळांना वारंवार भेटी देत सखोल तपास सुरू केला. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सायबर तपासाच्या आधारे हर्षद सुनील जाधव (रा. सासपडे), स्वप्नील संजय मगर (रा. ढोरोशी), विकास वाल्मिक कदम (रा. मरळोशी), विवेक विजय लादे (रा. सासपडे) आणि शेखर चंद्रकांत सावंत (रा. निवडे) यांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत या आरोपींनी सागर चंद्रकांत मोरे (रा. भुडकेवाडी, ता. पाटण) आणि अन्य साथीदारांच्या मदतीने बोरगाव परिसरात एक डीपी व चार ठिकाणी शेतीपंपांच्या कॉपर वायरची चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपासात आरोपींनी बोरगाव, कोरेगाव, सातारा तालुका, सातारा शहर, भुईंज आणि उंब्रज पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण 26 ठिकाणी चोरी केल्याचे उघड झाले.

पोलीसांनी आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली एक पिकअप, चार मोटारसायकली, पाच मोबाईल, चोरीसाठी लागणारे साहित्य, चोरीचा मुद्देमाल तसेच रोख रक्कम असा एकूण 20.22 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
उकल करण्यात आलेल्या 26 गुन्ह्यांमध्ये बोरगाव पोलीस ठाण्याचे 5, कोरेगावचे 10, सातारा तालुक्याचे 5, सातारा शहरचे 2, भुईंजचे 3 आणि उंब्रज पोलीस ठाण्याचा 1 गुन्हा समाविष्ट आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एम. बसवंत करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button