रहिवासी क्षेत्रात बेकायदेशीर फॅब्रिकेशन कारखान्याचा उच्छाद; नागरिकांची मुख्याधिकाऱ्यांकडे धाव.
रहिवासी क्षेत्रात बेकायदेशीर फॅब्रिकेशन कारखान्याचा उच्छाद; नागरिकांची मुख्याधिकाऱ्यांकडे धाव.

सातारा शहरातील गुरुवार पेठ परिसरात रहिवासी क्षेत्रात सुरू असलेल्या एका बेकायदेशीर फॅब्रिकेशन कारखान्यामुळे स्थानिक नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून आणि नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या ‘साई फॅब्रिकेशन’ कारखान्यावर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी परिसरातील रहिवाशांनी सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
गुरुवार पेठ हा भाग विकास आराखड्यानुसार पूर्णतः रहिवासी झोनमध्ये असतानाही या ठिकाणी लोखंडी फॅब्रिकेशनचा उद्योग अनधिकृतपणे चालवला जात आहे. या कारखान्यातून सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत ग्राइंडर, वेल्डिंग आणि हॅमरिंगचा प्रचंड आवाज येत असल्याने ध्वनी प्रदूषण वाढले आहे. याचा फटका लहान मुलांच्या अभ्यासाला आणि वृद्ध नागरिकांच्या आरोग्याला बसत असून परिसरातील नागरिक मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत. तसेच, वेल्डिंगच्या ठिणग्यांमुळे आग लागण्याची भीती आणि स्प्रे पेंटिंगमुळे श्वसनाचे विकार जडत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
प्रदूषणासोबतच सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. कारखान्यातील कामगारांकडून स्थानिक युवतीची छेडछाड झाल्याची गंभीर घटना घडली असून त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील महिला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नागरिकांनी आपल्या निवेदनात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम (MRTP) आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचा दाखला देत या कारखान्याचा वापर तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. कारखान्याला झालेला वीज पुरवठा खंडित करून नगरपालिकेने आपली अतिक्रमित जागा ताब्यात घ्यावी आणि कारखाना कायमस्वरूपी सील करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. येत्या १५ दिवसांत यावर ठोस कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही गुरुवार पेठ व मल्हार पेठ परिसरातील नागरिकांनी दिला आहे.



