साताऱ्यात वाद, अपंग व्यक्तीची पोलिसांत तक्रार.
तू सोशल मीडियावर धमकी दिलीस म्हणून डॉन झाला नाहीस'; स्टेटसवरून साताऱ्यात वाद, अपंग व्यक्तीची पोलिसांत तक्रार

तू सोशल मीडियावर धमकी दिलीस म्हणून डॉन झाला नाहीस’; स्टेटसवरून साताऱ्यात वाद, अपंग व्यक्तीची पोलिसांत तक्रार
सोशल मीडियावरील व्हॉट्सॲप स्टेटसच्या वादातून एका दिव्यांग व्यक्तीचा अपमान केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. सातारा शहरातील शाहूनगर, गोडोली येथील सागर जनार्दन भोसले या ४७ वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी विक्रम विजय घुले याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, १३ जानेवारी २०२६ रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास सागर भोसले हे घरी असताना, त्यांच्या मित्राने त्यांना आरोपी विक्रम घुले याने ठेवलेल्या एका व्हॉट्सॲप स्टेटसबाबत माहिती दिली. भोसले यांनी स्टेटस तपासले असता, त्यामध्ये “तू सोशल मीडियावर धमकी दिलीस म्हणजे तू डॉन झाला नाहीस, तुझ्यासमोर उभा होतो काय वाकडं केलंस? तू कुठल्या पदावर आहेस मला काही देणं घेणं नाही लंगड्या…” अशा आशयाचा प्रक्षोभक मजकूर लिहिलेला होता.
तक्रारदार सागर भोसले यांचा २०१४ मध्ये भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले असून त्यांना चालता येत नाही. आरोपीने स्टेटसमध्ये जाणीवपूर्वक ‘लंगड्या’ या शब्दाचा वापर करून आपल्या शारीरिक व्यंगाचा अपमान केला आणि आपल्या भावना दुखावल्या, अशी खात्री पटल्यानंतर भोसले यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी त्यांनी आरोपी विक्रम घुले याच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली असून, सातारा शहर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.



