Uncategorized

टीईटी परीक्षा केंद्रावर गोंधळ : वेळेत पोहोचूनही परीक्षार्थींना गेटवरच रोखले

टीईटी परीक्षा केंद्रावर गोंधळ : वेळेत पोहोचूनही परीक्षार्थींना गेटवरच रोखले

रविवारी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला. शहरातील डी.जी. कॉलेज केंद्रावर वेळेत पोहोचूनही अनेक परीक्षार्थींना आत प्रवेश नाकारल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून साताऱ्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी सकाळी ठरलेल्या वेळेत केंद्रावर हजर झाल्याचे सांगितले. मात्र, गेटवरच त्यांना थांबवून आत सोडण्यात आले नसल्याने त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. “आमचे वर्ष वाया गेले, आम्हाला कारण तरी सांगा. आम्हाला केंद्रसंचालकांना भेटायचे आहे,” अशी विनंती त्यांनी पोलिसांकडे केली.

या दरम्यान काही काळ परीक्षार्थी आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला. पोलिसांनी “नियमांनुसार प्रवेश देणे शक्य नाही” असे सांगत विद्यार्थ्यांना थांबवले.

घडामोडींची माहिती मिळताच सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी आणि निरंतर शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजवावर यांनी डी.जी. कॉलेज केंद्राला भेट दिली. त्यांनी पोलिसांना “संबंधित परीक्षार्थींना गेटच्या बाहेर काढा” अशा सूचना दिल्यानंतर विद्यार्थ्यांना पूर्णपणे बाहेर हटवण्यात आले.

मोठ्या आशेने आलेले परीक्षार्थी हातात प्रवेशपत्र घेऊन गेटसमोरच निराश अवस्थेत उभे राहिले. प्रशासनाच्या कठोर भूमिकेबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. “कसली दया-माया नाही, नियम सांगत आमचे भविष्य बिघडवले,” अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

यावेळी पोलिस व परीक्षार्थी यांच्यात शाब्दिक वादही झाला.
या गोंधळामुळे टीईटी परीक्षेच्या आयोजनाविषयी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button