कराड डी. वाय.एस. पी. कार्यालयाची मोठी कारवाई; अवैध अग्निशस्त्रासह दोघांना अटक.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची धडक कारवाई.
कराड शहर व मलकापूर नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत कराड विभागाच्या डी. वाय.एस.पी. कार्यालयाने अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई केली आहे.
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार सैदापूर कॅनॉल परिसरात सापळा रचून पोलिसांनी दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले. अटक केलेल्यांची नावे अल्तमश ऊर्फ मोन्या हारुण तांबोळी (२५, रा. मंगळवारपेठ, कराड) व ओमकार दिपक जाधव (२२, रा. सैदापूर, कराड) अशी आहेत.
त्यांच्याकडून पोलिसांनी ₹१.४० लाखांचा एकूण मुद्देमाल जप्त केला असून त्यात एक गावठी बनावटीचे अग्निशस्त्र, एक जिवंत राऊंड, एक स्मार्टफोन आणि एक दुचाकीचा समावेश आहे.
कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक अमित बाबर, तसेच अंमलदार प्रविण पवार, सागर बर्गे, प्रशांत चव्हाण व मयुर देशमुख सहभागी होते. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले.



