सातारा शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी लाच मागणाऱ्या एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले
वसंतराव नाईक महामंडळाच्या सातारा कार्यालयातील प्रकार ; शेळीपालन कर्ज प्रक्रियेसाठी मागितली होती लाच
सातारा शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी लाच मागणाऱ्या एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, सातारा येथील लिपिक (मानधनी) प्रदीप सर्जेराव सावंत (वय ४०) याला १५०० रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून अटक करण्यात आली आहे. तक्रारदार यांनी शासनाच्या वैयक्तिक परतावा योजनेंतर्गत शेळी पालन व्यवसायासाठी कर्जाकरिता अर्ज (दिनांक ३०/०५/२०२५) दाखल केला होता. या अर्जाची छाननी केल्यानंतर, अर्ज योग्य असल्याचे सांगून, तो पुढील कार्यवाहीसाठी (कर्जाचे हेतू पत्र – Letter of Intent) वरिष्ठ कार्यालयाकडे (रिजनल मॅनेजर, पुणे) ऑनलाईन पाठवण्यासाठी आरोपी लोकसेवक प्रदीप सावंत याने तक्रारदार यांच्याकडे दिनांक ०३/११/२०२५ रोजी पडताळणी कारवाईदरम्यान १,५००/- रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर, विभागाने सापळा रचला. त्यानुसार, दिनांक ०६/११/२०२५ रोजी सापळा कारवाईदरम्यान, आरोपी प्रदीप सावंत याला पंचासमक्ष १,५००/-रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
प्रदीप सावंत हा मु. सावंतवाडी, पो. अंबावडे बुद्रुक, ता. जि. सातारा येथील रहिवासी आहे.पोलिस कर्मचारी प्रशांत नलावडे, निलेश चव्हाण, प्रियांका जाधव, विक्रमसिंह कणसे व अजयराज देशमुख यांनी कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.तपासी अधिकारी म्हणून श्री. सुनील पाटील, पोलीस निरीक्षक व पर्यवेक्षण अधिकारी श्री राजेश वसंत वाघमारे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे. यांनी काम पाहिले श्री शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र आणि श्री अर्जुन भोसले, अपर पोलीस अधीक्षक २, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.



