Uncategorized

सातारा: विजयी मिरवणुकीत फटाके फोडण्यास विरोध केल्याने पंचायत समिती सदस्यावर हल्ला; मेढा पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल.

मेढा, ता. जावळी प्रतिनिधी प्रसन्न पवार: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीतील विजयानंतर जावळी तालुक्यातील वरोशी येथे काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत राडा झाला. घरात लहान मुलगी असल्याने फटाके फोडण्यास मना केल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे पंचायत समिती सदस्य अतिश कदम यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार ज्ञानदेव किसन रांजणे यांच्या समर्थकांनी वरोशी गावात विजयी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत डीजे आणि फटाक्यांची मोठी आतषबाजी सुरू होती.

मिरवणुकीदरम्यान फटाके घराच्या दिशेने उडवले जात असल्याने, फिर्यादी अतिश कदम यांच्या आई संगीता कदम यांनी “घरात तीन महिन्यांची लहान मुलगी आहे, कृपया येथे फटाके फोडू नका,” अशी विनंती केली. याचा राग मनात धरून संबंधितांनी त्यांना शिवीगाळ केली.

पोलीस ठाण्याच्या आवारातच राडा

या प्रकारानंतर पंचायत समिती सदस्य अतिश कदम व त्यांचे सहकारी तक्रार देण्यासाठी मेढा पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, पोलीस ठाण्याच्या बाहेरच आरोपींनी अचानक त्यांच्यावर हल्ला करून डोक्यावर व नाकावर गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या अतिश कदम यांना तत्काळ उपचारासाठी मेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा

फिर्यादी अतिश संतोष कदम (वय २६, रा. वरोशी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेढा पोलिसांनी खालील तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे:

  • प्रदीप मोहन कासुर्डे (रा. वरोशी, ता. जावळी)

  • गणेश विष्णू शिंदे (रा. मेढा, ता. जावळी)

  • अक्षय नामदेव करंजेकर (रा. मेढा, ता. जावळी)

सीसीटीव्ही फुटेजची मागणी

या घटनेमुळे निवडणुकीच्या आनंदाला व जल्लोषाला मोठे गालबोट लागले आहे. सदर घटना मेढा पोलीस ठाण्याच्या आवारातच घडल्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी फिर्यादी अतिश कदम यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मेढा पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button