Uncategorized

जिद्दीच्या जोरावर यश! जावळी तालुक्यातील साक्षी चौधरी सातारा पोलीस दलात ठरली सर्वात तरुण ‘वाहन चालक’

मेढा (प्रतिनिधी) श्रीकांत गोळे

लहानपणापासूनची वाहन चालवण्याची आवड आणि जिद्दीच्या जोरावर जावळी तालुक्यातील मोहाट गावच्या सुकन्या कुमारी साक्षी सुनील चौधरी हिने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी सातारा पोलीस दलात वाहन चालक पदावर धडक मारली आहे. विशेष म्हणजे, सातारा पोलीस दलातील १० महिला चालकांमध्ये साक्षी ही सर्वात कमी वयाची महिला चालक ठरली असून तिचा हा प्रवास तरुण तरुणींसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.

पहिल्याच प्रयत्नात यश आणि खडतर प्रवास

मोहाट गावचे सेवानिवृत्त सचिव तथा माजी उपसरपंच एकनाथ चौधरी यांची साक्षी ही नात असून, शहीद रवींद्र धनावडे यांच्या मोहाट गावची ती सुकन्या आहे. साक्षीला लहानपणापासूनच वाहने चालवण्याची प्रचंड आवड होती. वयाची १८ वर्षे पूर्ण होताच तिने चार चाकी वाहन चालवण्याचा परवाना (Driving License) मिळवला. त्यानंतर जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने २०२५ मध्ये पहिल्याच प्रयत्नात पोलीस चालक पदाची परीक्षा उत्तीर्ण करत आपले पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले.

ओ

खंडाळा येथे कठोर प्रशिक्षण

खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तिने नुकतेच ६ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षण काळात तिने स्कार्पिओपासून ते अवजड वाहनांपर्यंत सर्व प्रकारच्या गाड्या चालवण्याचे तांत्रिक ज्ञान, वाहनांची देखभाल, सुरक्षित वाहन चालवण्याचे नियम आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये वाहन हाताळण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे. मला सर्व वाहनांची तांत्रिक माहिती असून मी कोणतेही वाहन उत्तमरीत्या चालवू शकते, असा आत्मविश्वास साक्षीने व्यक्त केला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनावर जबाबदारी

सध्या साक्षी चौधरी या भुईंज पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी पुनम झगडे यांच्या शासकीय वाहनावर चालक म्हणून आपली सेवा बजावत आहेत. पोलीस दलातील वाहन चालकाची जबाबदारी केवळ गाडी चालवण्यापुरती मर्यादित नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळेत व सुरक्षित पोहोचवणे, वाहनाची निगा राखणे आणि प्रसंगावधान राखणे या सर्व जबाबदाऱ्या ती अत्यंत आत्मविश्वासाने पार पाडत आहे.

तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button